महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप ) – मोशी-देहू-आळंदी मेट्रोसाठी नगरसेवक विकास साने यांचा यशस्वी पाठपुरावा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश, मोशी ते आळंदी आणि देहू या अत्यंत वर्दळीच्या आणि पवित्र तीर्थक्षेत्रांच्या मार्गावर मेट्रो धावण्याच्या दिशेने एक महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड घडली आहे. वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडीची सततची समस्या, वाढते अपघात आणि लाखो भाविकांची होणारी ये-जा या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत नगरसेवक विकास नामदेव साने यांनी या थेट मेट्रो मार्गाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी आक्रमक पाठपुरावा सुरू केला आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून विकास साने यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री कार्यालयात जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भातील अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनातून त्यांनी या मार्गावरील प्रवाशांची व वारकऱ्यांची होणारी परवड प्रभावीपणे मांडली.विकास साने यांच्या या पाठपुराव्याची अत्यंत सकारात्मक दखल घेत सुनेत्रा वहिनी पवार यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी पुणे महामेट्रोचे श्रावण हर्डीकर यांना या प्रकल्पाबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रस्तावावर आगामी सोमवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
या जलद हालचालींमुळे मोशी–देहू–आळंदी मेट्रो प्रकल्पाच्या तांत्रिक सर्वेक्षणाला, व्यवहार्यता तपासणीला (Feasibility Study) आणि सविस्तर प्रकल्प आराखड्याला (DPR) आता वेगवान गती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक अधिक सुटसुटीत होणार असून, वारकरी संप्रदाय आणि स्थानिक नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे.
विकास साने यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये अत्यंत आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




