महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – नागरिकांचे हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळवून देण्यासाठी लातूर शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर यांच्या विशेष परिश्रमातून एकूण १४ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात आले आणि ते मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली. विवेकानंद चौक आणि गांधी चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील काळात मोबाईल हरविल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तांत्रिक तपास, उपलब्ध माहितीचे विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हरवलेल्या मोबाईल्सचा माग काढला. यात पीआय अरविंद पवार यांच्या नेतृत्वात आणि अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनने १४ मोबाईल हस्तगत केले.
दिनांक ३० जुलै २०२६ रोजी लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल संबंधित मुळ मालकांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेला मोबाईल पुन्हा हाती मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांनी विवेकानंद चौक पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली; उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय जाधव यांच्या समन्वयातून पूर्ण झाली. विशेषतः पीआय अरविंद पवार आणि अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या तांत्रिक कौशल्य, चिकाटी आणि नागरिकभिमुख कार्यपद्धतीमुळे ही मोहीम यशस्वी झाली. हरवलेल्या मोबाईल्सचा शोध घेण्याची ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहील. नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





