महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने जुगार अड्डे आणि मटका बुकींवर एकामागून एक धडक कारवाया केल्या. रेणापूर, गांधी चौक, शिवाजीनगर आणि आता निलंगा पोलीस स्टेशन हद्दीतही छापे पडले. रोकड, मोबाईल, वाहने जप्त झाली, आरोपी ताब्यात घेतले. नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे – हे अड्डे स्थानिक पोलीस ठाण्यांच्या नाकाखालीच चालत होते, मग इथल्या पोलीस निरीक्षकांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची जराही माहिती कशी नव्हती?
चोरी, खुनाचे, मोबाईल चोरीचे गुन्ह्यांची काही तासांत उकल करतात . पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात कारवाई होते, आरोपी ताब्यात येतात. पण जुगार आणि मटका या अवैध धंद्याबाबत हीच यंत्रणा अचानक ‘अज्ञात’ कशी होते? DIG शहाजी उमाप यांच्या पथकाची कारवाई होते, स्थानिक पोलीस मात्र ‘आम्हाला काहीच कळलं नाही’ अशा भूमिकेत दिसतात. हा फरक नागरिकांना दिसत आहे.
रेणापूर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि निलंगा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात हे छापे पडले. मग या सर्व पोलीस निरीक्षकांना आपल्या हद्दीतील जुगार अड्डे आणि मटका बुकींबद्दल कशी काय माहिती नव्हती? हा प्रश्न आता जोरात विचारले जात आहेत.
नागरिक स्पष्टपणे बोलत आहेत – चोरी-खुनाच्या गुन्ह्यात जसे मार्गदर्शन आणि नेतृत्व दिसते, तसे जुगार-मटका या बाबतीत का दिसत नाही? DIG पथक जेव्हा कारवाई करते तेव्हा अड्डे उघडकीस येतात, पण स्थानिक यंत्रणा याबाबत निष्क्रिय का दिसते? यामुळे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाबाबत आणि संबंधित पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित होत आहे.
लातूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध अनेकदा कारवाया केल्याचे दावे केले आहेत. पण DIG शहाजी उमाप यांच्या पथकाने मागील काही दिवसांत एकापाठोपाठ केलेल्या या छाप्यांनी स्थानिक यंत्रणेच्या ‘जागरूकते’वरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागरिकांचा प्रश्न सरळ आहे – हे अड्डे इतके खुलेआम चालत असताना स्थानिक पोलीस कसे अनभिज्ञ राहिले ? की मग कारवाई फक्त ‘वरून’ आली तरच होते? लातूर पोलिसांना या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अन्यथा ‘काही तासांत गुन्हे उकलणारी’ यंत्रणा जुगार – मटकाबाबत ‘अज्ञात’ राहिल्याचे चित्र जनमानसात अधिकच गडद होईल.




