महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेची प्रभावी मोहीम यशस्वी; ₹9.18 लाखांचे साहित्य जप्त करून सार्वजनिकरित्या नाश, नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था जपण्यासाठी अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि मंगेश चव्हाण व समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी राबविलेली ध्वनी प्रदूषणविरोधी विशेष मोहीम अत्यंत यशस्वी ठरली.
या मोहिमेत शहरातील विविध मार्ग, चौक आणि संवेदनशील भागांत वाहनांची तपासणी करून बेकायदेशीर व कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यात 149 सायलेन्सर, 19 साऊंड बॉक्स, 6 हार्न, 25 एलईडी लाईट्स आणि 13 टेप रेकॉर्डर असा एकूण ₹9,18,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
जप्त साहित्य पुन्हा वापरात येऊ नये आणि नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा या उद्देशाने 7 एप्रिल 2026 रोजी रोड रोलरच्या सहाय्याने सर्व साहित्य सार्वजनिकरित्या निकामी करण्यात आले. या प्रक्रियेत पोलीस अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी व पंच उपस्थित होते. निकामी साहित्याच्या स्क्रॅप विक्रीतून ₹16,560/- रक्कम प्राप्त झाली असून ती शासनाकडे जमा करण्यात येत आहे.
या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असून नागरिकांना शांत आणि सुरक्षित वातावरण मिळणार आहे. लातूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहनांवर बेकायदेशीर सायलेन्सर, कर्णकर्कश हार्न किंवा साऊंड सिस्टीम बसवू नये, असे आवाहन केले आहे. भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबवून ध्वनी प्रदूषणमुक्त शहर घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या हितासाठी पोलीस प्रशासनाची ही सकारात्मक आणि प्रभावी कारवाई ठरत आहे.








