महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – नवे पाऊल, नवी जबाबदारी! पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, पक्षाकडून रविकांत वरपे यांची पुणे शहर जिल्हा तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या (बारामती, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघ) जिल्हा निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे पक्ष संघटना अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आले आहे. सोपवलेली जबाबदारी ही केवळ सन्मानाची नसून पक्षाच्या विचारांचा प्रसार आणि कार्य अधिक व्यापक करण्याची मोठी संधी असल्याची भावना रविकांत वरपे यांनी व्यक्त केली. आगामी काळात पुणे जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी पक्षाचे आदरणीय नेते पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत पक्षाचे विचार आणि कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविकांत वरपे यांच्या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यात पक्ष संघटनाला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.








