महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी लातूर स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आंतरजिल्हा स्तरावर सक्रिय असलेल्या सराईत मोटारसायकल चोराला अटक करत तब्बल ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी महादेव गरड (रा. अंबुलगा, ता. चाकूर) याला रंगेहात पकडण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीकडून लातूरसह पुणे शहरातील सिंहगड रोड व धायरी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली मिळाली. पोलिसांनी अजिंक्य सिटी परिसरात छापा टाकून एकूण ६ मोटारसायकली (अंदाजे किंमत १.७० लाख रुपये) जप्त केल्या. यामुळे लातूर व पुण्यातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
या कारवाईत पोउपनि राजेश घाडगे, युवरा जगिरी, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे व शैलेश सुडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील एलसीबी पथकाने केलेली ही धडाकेबाज कारवाई गुन्हेगारांवर पोलिसांचा वाढता दबदबा दाखवणारी ठरली असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.







