महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 (क) मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रेरणा होनराव यांनी काँग्रेसच्या माजी महापौर स्मिता खानापुरे यांचा पराभव करत देदीप्यमान यश संपादन केले आहे.
महानगरपालिकेच्या एकूण 70 जागांपैकी भाजपाला 22 जागांवर विजय मिळाला असून, इतर जागांवर काँग्रेसला यश मिळाले असले तरी प्रभाग 15 मधील निकाल राजकीयदृष्ट्या विशेष लक्षवेधी ठरला आहे. या प्रभागात प्रेरणा होनराव यांनी 4245 मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या माजी महापौर स्मिता खानापुरे यांना 3522 मते मिळाली. परिणामी प्रेरणा होनराव या 723 मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत.
या विजयानंतर प्रेरणा होनराव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रभागातील मतदारांचे आभार मानले. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, “प्रभागातील माझ्या सर्व माता-भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. हा विजय माझा नसून आपल्या सर्वांच्या विश्वासाचा आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि जनसेवेचे व्रत घेऊन मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. आपल्या प्रेमाची आणि आशीर्वादाची ही शिदोरी मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देईल.”
अनुभवी उमेदवाराचा पराभव करत मिळवलेला हा विजय भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात असून, प्रभाग 15 मध्ये प्रेरणा होनराव यांच्या नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचे हे स्पष्ट प्रतिबिंब आहे.



