संजय रंदाळे यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी लातूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर भाजपची शिस्तभंगाची कारवाई

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाला थेट चाप लावत जोरदार कारवाई केली असून पक्षाच्या संघटनात्मक शिस्तीला तडा देणाऱ्या संजय रंदाळे यांना पक्षातून सहा वर्षासाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

पक्षाचे पदाधिकारी असताना पक्षशिस्त, अधिकृत धोरणे व निर्णय धाब्यावर बसवून स्वतःचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षात गोंधळ, गैरसमन्वय व अनुशासनहीनतेचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले,

या गंभीर प्रकाराची दखल घेत लातूर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सखोल आणि कठोर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षहित सर्वोच्च मानत संजय रंदाळे यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून, सध्या भूषवत असलेली सर्व पदे तत्काळ सहा वर्षासाठी काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर, संजय रंदाळे यांना भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्यातून थेट सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय कोणत्याही दबावाला न जुमानता, पक्षाची शिस्त अबाधित ठेवण्यासाठी लातूर भाजपा कडून घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षशिस्त मोडणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा थेट आणि कडक संदेश या कारवाईतून लातूर शहर भाजपने दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘शिस्त प्रथम’ धोरण अमलात असून बंडखोरीला थारा दिला जाणार नाही, हे या घटनेतून ठळकपणे समोर आले आहे.