महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर दौऱ्यावर आलेले भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाषणात केलेले अजबदार, बेजबाबदार आणि इतिहासाशी बेइमानी करणारे वक्तव्य लातूरकरांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे. “माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील” असे वक्तव्य करून चव्हाण यांनी केवळ राजकीय भानच हरपले नाही, तर लातूरच्या स्वाभिमानालाच थेट आव्हान दिले आहे.
विलासराव देशमुख हे लातूरचे सुपुत्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी, विकासाभिमुख आणि लोकमान्य नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा करणाऱ्यांना लातूरकर आता मतपेटीतून उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.
लातूरकर थेट प्रश्न विचारत आहेत — “तुम्हाला निवडणूक लढवायची आहे की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा इतिहास पुसायचा आहे?”
निवडणुकीत विकास, नागरिक सुविधा, शहराच्या प्रश्नांवर बोलायचे सोडून लातूरच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रकार चव्हाण यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे द्योतक ठरत आहे. लातूरच्या मातीशी नाळ जोडलेली असताना, त्या मातीतील नेतृत्वावर टीका करून त्यांनी स्वतःच्याच पक्षासाठी राजकीय खड्डा खोदला आहे, अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
या वक्तव्यामुळे राज्यभरात, विशेषतः लातूरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, रवींद्र चव्हाण यांच्या या बेताल बोलण्याचा फटका निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र आता निश्चित मानले जात आहे.


