महाराष्ट्र खाकी (छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या जुन्या अभिलेखांमधील नोंदी शोधण्याची प्रक्रिया आता नागरिकांसाठी अधिक सुलभ झाली आहे. न्यायमूर्ती (निवृत्त) शिंदे समितीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या कुणबी-मराठा नोंदी आता गावनिहाय ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नोंदी पाहता येतात.
या सुविधेमुळे नागरिकांना जुन्या अभिलेखांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याऐवजी मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून घरबसल्या संबंधित गावाची नोंद शोधता आणि उपलब्ध कागदपत्र डाउनलोड करता येणार आहेत.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी एका मार्गदर्शनपर व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना ही प्रक्रिया समजावून सांगितली आहे. नोंदी कशा शोधायच्या, संबंधित अभिलेख कसा डाउनलोड करायचा, त्यातील माहिती कशी तपासायची आणि उपलब्ध नोंदींच्या आधारे वंशावळ जोडून जात प्रमाणपत्रासाठी अर्जाची प्रक्रिया कशी पुढे नेता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
लातूरसह आठ जिल्ह्यांसाठी ऑनलाइन सुविधा
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर ‘कुणबी मराठा दस्तावेज’ या स्वतंत्र छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्हानिहाय नोंदी उपलब्ध आहेत. नागरिक आपल्या जिल्ह्याची निवड करून पुढे संबंधित गाव आणि उपलब्ध अभिलेख शोधू शकतात.




