महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, दुबार पेरणीचे संकट ओढवलेले पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात अन्नाचा कण नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे आणि बळीराजा हतबल झाला आहे शेतकरी जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा अत्यंत भीषण आणि दाहक परिस्थितीतही लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड आपल्या घरातून बाहेर पडायला तयार नाहीत, असा तीव्र संताप व्यक्त करत एकुर्गा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय टेकाळे पाटील आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून आक्रमक झालेले टेकाळे पाटील यांनी थेट आमदार आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत धारेवर धरले आहे. निवडणुकीच्या दिवसांत मतांची भीक मागण्यासाठी गावोगावी आणि शेतकऱ्यांच्या दारात चकरा मारणारे हेच लोकप्रतिनिधी आज बळीराजा मरणाच्या दारात उभा असताना कुठे लपून बसले आहेत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. “आज शेतकरी हलाकीत जगत असताना आमदार घरात बसून काय करत आहेत? हे सरकार नेमके झोपले आहे का? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन पुढे का येत नाही?” अशा शब्दांत त्यांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे.
आमदार रमेश कराड यांच्या घरासमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा
सरकार आणि स्थानिक आमदारांच्या या निगरगट्ट भूमिकेविरोधात आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, लवकरात लवकर राज्य सरकारने आणि आमदार रमेश कराड यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज घोषित करावे. अन्यथा, शांत बसलेला शेतकरी आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत त्यांनी स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांना लागणाऱ्या मदतीची पूर्तता झाली नाही तर शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट आमदार रमेश कराड यांच्या निवासस्थाना समोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात येईल. आता बळीराजाच्या या आक्रमक आवाजाची आणि रोषाची दखल शासन-प्रशासन आणि आमदार कधी घेणार?




