Home » महाराष्ट्र » चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची पुणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती; विकासकामांना मिळणार नवा वेग

चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची पुणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती; विकासकामांना मिळणार नवा वेग

महाराष्ट्र खाकी (चिंचवड / विवेक जगताप ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची पुणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या (DMF – District Mineral Foundation) नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेमार्फत याबाबतचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे मतदारसंघासह जिल्ह्यातील खनिजबाधित क्षेत्रांच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच ११ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेतील तरतुदींना अनुसरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा खनिज अधिकारी तथा सदस्य सचिव आनंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे नियुक्तिपत्र जारी केले आहे.

नियामक परिषदेची जबाबदारी आणि कार्ये
जिल्हा खनिज प्रतिष्ठानची नियामक परिषद ही खनिकर्म क्षेत्र आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या भागांच्या विकासासाठी धोरण ठरवणारी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. या परिषदेमार्फत प्रामुख्याने खालील कामे पार पाडली जातात:
1)  खनिकर्म बाधित भाग आणि तेथील नागरिकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी धोरण आखणे.
2) प्रतिष्ठानचा वार्षिक कृती आराखडा (Annual Action Plan) आणि अर्थसंकल्प मंजूर करणे.
3)  क्षेत्रातील विकासकामांना अधिकृत मान्यता देणे.
4)  उपलब्ध निधीचा योग्य, सुयोग्य आणि पारदर्शक वापर होत असल्याची खात्री करणे.
5) सुरू असलेल्या विकासकामांचा वेळोवेळी आढावा घेणे.
6)  वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षित (Audited) खात्यांना मंजुरी प्रदान करणे.

नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देणार – आमदार शंकर जगताप
या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून मिळालेली ही महत्त्वाची जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जनहितासाठी पार पाडणार आहे. खनिजबाधित भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त आणि पारदर्शक वापर व्हावा, यासाठी माझे नेहमीच प्राधान्याने प्रयत्न राहतील.”
आमदार शंकर जगताप यांच्या या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील विकासकामांना आणखी बळ मिळून नागरिकांच्या प्रलंबित व महत्त्वपूर्ण प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share This News

Related Post

National