Home » पोलीस » चाकूरमधील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची LCB PI बावकरांनी उकल करत, राजस्थान, गुजरात, कर्नाटक अन महाराष्ट्रात गुन्हे दाखल असलेले आरोपी केले अटक

चाकूरमधील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची LCB PI बावकरांनी उकल करत, राजस्थान, गुजरात, कर्नाटक अन महाराष्ट्रात गुन्हे दाखल असलेले आरोपी केले अटक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेस चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत राजस्थानमधील एका आंतरराज्यीय कुख्यात गुन्हेगाराचा पर्दाफाश केला आणि पोलिसांनी २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक मालमत्तेविषयक गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेत होते. यादरम्यान, ३ सप्टेंबर २०२६ रोजी नवीन रेणापूर नाका, लातूर येथील आप्पा पान शॉपसमोर दोन इसम होंडा शाईन मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास  १. राहुल बादल बंजारा ऊर्फ पंडितसिंग धरमसिंग जुन्नी (वय ५३ वर्षे, रा. इंदिरा कॉलनी, भादरलाऊ, जि. पाली, राजस्थान, ह.मु. शिवाजी चौक, परळी वैजनाथ, जि. बीड)
२. बच्चनसिंग मंगलसिंग बावरी (वय ४५ वर्षे, रा. नागसेन नगर, परळी वैजनाथ, जि. बीड) या दोन संशयितांना ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान मुख्य आरोपी राहुल बादल बंजारा याच्याकडे धारदार लोखंडी चाकू आणि चोरीतील सोन्याचे दागिने मिळून आले. चौकशी केली असता, त्यांनी आपल्या एका अन्य साथीदाराच्या मदतीने चाकूर येथे महिलेस चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक धारदार लोखंडी चाकू
होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (क्र. एमएच- २६- एवाय- ४३४९), एकूण जप्त मुद्देमाल २ लाख १० हजार रुपये जप्त केला.
आरोपीची आंतरराज्यीय गुन्हेगारी पार्श्वभूमी
या कारवाईतील मुख्य आरोपी राहुल बादल बंजारा ऊर्फ पंडितसिंग याच्यावर विविध राज्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र (६८), गुजरात (२०), राजस्थान (११) आणि कर्नाटक (०२) अशा विविध राज्यांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा, प्राणघातक हल्ला व सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. राजस्थानमधील पाली, अजमेरसह महाराष्ट्रातील बीड, परळी, नांदेड, परभणी, उदगीर आणि गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत त्याच्या नावावर गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यातील तिसरा आरोपी जगजितसिंग अचोलसिंग दुधानी (रा. शिवाजी चौक, परळी, जि. बीड) हा सध्या फरार असून, त्याचा व गुन्ह्यात वापरलेल्या दुसऱ्या मोटारसायकलचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांच्या पथकाने पार पाडली आहे.

Share This News

Related Post

National