महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात आता लातूरचा मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. असे असतानाही सरकार सुस्त झोपेत असल्याने आणि कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्यामुळे मराठा बांधवांमध्ये प्रचंड रोष उसळला आहे. या सरकारच्या मुजोरीचा निषेध करण्यासाठी आणि जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या, ३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याची हाक मराठा समाजाने दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, टायर जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. “आमच्या नेत्याच्या प्रकृतीला काही झाले, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेईल,” असा सज्जड दम सरकारला भरण्यात येत आहे. लातूरमध्येही याच रोषातून उद्या संपूर्ण व्यवहार आणि प्रतिष्ठाने बंद ठेवून तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे.
सरकारच्या या टोलवाटोलवी आणि संवेदनशून्या भूमिकेमुळे आता मराठा समाजाचा संयम सुटला असून, परिस्थिती कधीही हातघाईवर येऊ शकते. लातूर बंदच्या माध्यमातून सरकारला हा अंतिम इशारा असणार असून, यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर तीव्र आंदोलनांना सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे.




