महाराष्ट्र खाकी (पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या हिंसक हल्ल्यात केसरेकर दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला. या अमानुष आणि संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या अशा नृशंस प्रवृत्तींचा कठोर शब्दांत निषेध होणे आणि दोषींना कायद्यानुसार फासावर लटकवणे, हीच आज संतप्त समाजाची एकमेव अपेक्षा आहे.
मात्र, या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यावरही राजकारण तापू लागले असून, यावरून आता राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
महेश लांडगे यांच्या आक्रमक भूमिकेचे समर्थन
या घटनेच्या निषेधार्थ सांगली येथे निघालेल्या तीव्र मोर्चानरम्यान भाजपा आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक भाषेत आपली भूमिका मांडली होती. त्यांच्या वक्तव्याच्या भाषेवर मतभेद असू शकतात; परंतु त्यामागील मूळ भावना ही गुन्हेगारांविरुद्ध समाजात निर्माण झालेला असंतोष आणि अशा घटनांना लगाम लागला पाहिजे, हीच होती. कायदा हातात घेण्याचे समर्थन कधीही होऊ शकत नाही आणि आरोपीला शिक्षा देण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेलाच आहे, याची जाणीव लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही पूर्णपणे आहे. मात्र, एखाद्या अमानुष हत्याकांडानंतर समाजाच्या मनात निर्माण झालेला संताप बाहेर पडला म्हणून त्या संपूर्ण जनक्षोभालाच गुन्हा ठरविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार महेश लांडगे यांना आवरण्याचे आवाहन करत, *”पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा”* अशा आशयाचे आव्हान दिल्याच वृत्त माध्यमांनी दिले.
यावर तीव्र आक्षेप घेत भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे यांनी सुप्रिया सुळे यांना थेट सवाल केला आहे, “सुप्रिया ताई, हा प्रश्न महेश लांडगे विरुद्ध सुप्रिया सुळे असा वैयक्तिक संघर्ष करण्याचा नाही! हा प्रश्न आहे सांगलीतील त्या निरपराध दाम्पत्याच्या हत्येचा आणि त्यांच्या दुःखात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा!”
ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांना न्याय कसा मिळणार? आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कशी होणार? आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायद्याचा धाक कसा निर्माण होणार? यावर आपण सर्वांनी एकत्र येऊन बोलले पाहिजे. “पहिला वार माझ्यावर करा”* असे वैयक्तिक आव्हान देण्याऐवजी, “पहिला वार कोणत्याही निष्पाप नागरिकावर होऊ देणार नाही!” अशी ठाम भूमिका घेणे आज काळाची गरज आहे, असे दुर्गे यांनी ठणकावून सांगितले.
धर्माच्या राजकारणाला सक्त विरोध
या हत्याकांडातील आरोपीच्या धर्माच्या आधारावर संपूर्ण समाजाला दोषी ठरविणे आम्हालाही अजिबात मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपाने घेतली आहे. गुन्हेगार हा केवळ गुन्हेगार असतो; त्याचा धर्म पाहून गुन्ह्याचे समर्थन किंवा विरोध होता कामा नये. तसेच या हत्याकांडाचा निषेध करताना कोणत्याही धर्मातील निरपराध नागरिकांविरुद्ध द्वेष निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांना जाहीर व स्पष्ट सवाल
1. आपला विरोध नेमका महेश लांडगे यांच्या भाषेला आहे की सांगलीतील हत्याकांडानंतर समाजात उसळलेल्या संतापाला आहे?
2. जर विरोध केवळ आक्रमक भाषेला असेल, तर भाषेवर चर्चा करा, पण हत्याकांडाचा निषेध करणाऱ्या समाजाच्या भावनेला आरोपीच्या बाजूने उभे असल्यासारखे चित्र निर्माण करणाऱ्या राजकीय वादात ओढू नका!
महाराष्ट्राच्या संतप्त आणि शांतताप्रिय समाजाची स्पष्ट मागणी
गुन्हेगार कोणत्याही धर्माचा असो, त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे!
निष्पाप नागरिक कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याच्या संरक्षणासाठी संपूर्ण समाज एकजूट उभा राहिलाच पाहिजे!
अशा घटनांविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक नेत्याला किंवा व्यक्तीला संकुचित राजकीय चष्यातून पाहणे आता थांबले पाहिजे.
महेश लांडगे यांना “आवरा” असे सांगण्यापेक्षा, “गुन्हेगारी प्रवृत्तीला आवरा, समाजात हिंसा निर्माण करणाऱ्या मानसिकतेला आवरा आणि निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर सुरक्षा व्यवस्था उभी करा,” अशी ठाम मागणी आपण मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे केली पाहिजे, असा सज्जड दमही राजाभाऊ दुर्गे यांनी यादरम्यान भरला आहे. सांगलीच्या केसरेकर दाम्पत्याला खरी श्रद्धांजली म्हणजे दोषींना फासावर लटकवणे आणि भविष्यात अशी अमानुष कृत्ये पुन्हा कधीही घडणार नाहीत याची कठोर दक्षता घेणे, हीच महाराष्ट्राच्या शांतताप्रिय समाजाची एकमेव अपेक्षा आहे.




