महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – प्रेरणा होनराव यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदासह माध्यम विभाग पॅनेल संयोजनाची महत्त्वाची जबाबदारी, पक्षाच्यानिष्ठेचे चीज; प्रेरणा होनराव यांच्यावर मोठी जबाबदारी, पक्षाचे काम सदैव निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अग्रस्थानी असलेल्या प्रेरणा होनराव यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदासोबतच माध्यम विभाग पॅनेल संयोजनाची नवी जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.
प्रेरणा होनराव यांनी विविध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून पक्षाची भूमिका, पक्ष नेतृत्वाचे देशासाठीचे कार्य तसेच विकासकामे जनतेसमोर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूदपणे मांडली आहेत. यापूर्वी त्यांना दिलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी अत्यंत तन्मयतेने आणि चोखपणे पार पाडली आहे. त्यांच्या याच उत्कृष्ट कार्याचा विचार करून पक्षाने त्यांच्यावरील विश्वास आणखी दृढ करत त्यांच्याकडे माध्यम विभाग पॅनेल संयोजनाची अतिरिक्त धुरा सोपवली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रेरणा होनराव यांचे मनोगत आणि कृतज्ञता
या नवीन जबाबदारीबद्दल बोलताना प्रेरणा होनराव यांनी पक्षाचे आणि नेत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, “पक्षाने वेळोवेळी माझ्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवून जो विश्वास दाखवला आहे, तो माझ्यासाठी अमूल्य आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मिळालेली ही नवी जबाबदारी माझ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी असून, आगामी कार्यकाळात अधिक जोमाने आणि समर्पित भावनेने काम करण्याचा माझा दृढ निर्धार आहे.
” यावेळी त्यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. “त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच दीपस्तंभासारखे राहिले आहे,” असे सांगत त्यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचेही मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा आणि संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच पक्षाची भूमिका यापुढेही अधिक ठामपणे आणि प्रभावीपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रवासात सदैव पाठबळ देणारे सर्व मार्गदर्शक, सहकारी, आप्तेष्ट आणि शुभचिंतक यांच्या प्रेमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.




