महाराष्ट्र खाकी (पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – सायबर गुन्हेगारीवर वचक बसवत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एका थरारक कारवाईत २ कोटी १४ लाखांहून अधिक रुपयांच्या फसवणुकीतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.
काय आहे नेमकी घटना ?
एका सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला “तुमच्या बँक खात्यात पीएफआयशी संबंधित (PFI Related Money) पैसे जमा झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते,” अशी भीती दाखवून डिजिटल अरेस्टसारखी बतावणी करण्यात आली. आरोपींनी बनावट पोलीस कागदपत्रे व नोटिसा दाखवून वेगवेगळ्या खात्यांतून तब्बल २ कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपये उकळले. याप्रकरणी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची खडतर आणि यशस्वी तपास मोहीम
तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी सहा बँक खात्यांचा वापर झाल्याचे उघडकीस आले. ‘एम/एस सुलतान कन्स्ट्रक्शन अॅड मटेरियल सप्लायर्स’च्या आयसीआयसीआय बँक खात्यात ४९ लाख २० हजार २०० रुपये जमा झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी **राजेंद्र गणराज नागर (३२, रा. जलखोडा, ता. नैनवा, जि. बूंदी, राजस्थान)** याच्या नावावर हे खाते असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौकशीची नोटीस बजावल्यानंतर आरोपीने मोबाईल बंद करून पळ काढला होता. मात्र, बँकेचे सीसीटीव्ही फुटेज , मोबाईल सीडीआर आणि तांत्रिक विश्लेषणावरून त्याचे राजस्थानमधील बूँदी येथील स्थान निश्चित करण्यात आले. ८ ऑगस्ट रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुख्य आरोपी राजेंद्र नागर याला बेड्या ठोकण्यात आल्या. चौकशीत त्याने अरविंद ऊर्फ राजा याच्या साथीने ही रक्कम खात्यात स्वीकारून विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
पोलीस पथकाचे उल्लेखनीय योगदान
सदर यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण व प्रकाश कातकडे, दिपक भोसले, सुभाष पाटील, विनायक म्हसकर, दिपक माने, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, ज्योती साळे यांनी पार पडली.




