महाराष्ट्र खाकी ( पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – नागरिकांच्या जीवाशी हा खेळ चालवलाय कोणी? पिंपरी-चिंचवडमधील लोंबनाऱ्या इंटरनेट केबल्सवरून सामाजिक कार्यकर्ते साकी गायकवाड आक्रमक, शहरात बिनदिक्कतपणे आणि मनमानी पद्धतीने मोकाट सोडलेल्या इंटरनेट केबल्समुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या जीवघेण्या समस्येला नेमका जबाबदार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हेच नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आणि थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते साकी गायकवाड यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर धोकादायकरित्या लोंबकळणाऱ्या या केबल्सचा लाईव्ह व्हिडिओ करत त्यांनी प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.
साकी गायकवाड आक्रमक शहरातील विविध रस्त्यांवर आणि चौकांमध्ये इंटरनेट आणि फायबर केबल्सचे जाळे विखुरले असून अनेक ठिकाणी त्या खाली लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या वायरमुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे अपघात होण्याचा आणि जीवितहानी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हाच गंभीर प्रकार रात्रीच्या अंधारात व्हिडिओच्या माध्यमातून उघड करत साकी गायकवाड यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले .
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत साकी गायकवाड यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे, शहरात विनापरवाना आणि नियमबाह्यपणे लोंबकळणाऱ्या या मोकाट केबल्स तातडीने हटवण्यात याव्यात. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आणि लवकरात लवकर ठोस कारवाई न केल्यास, थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड दम प्रशासनाला भरण्यात आला आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, महापालिका प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेणार आणि आयुक्तांकडून यावर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




