निरागस हसू, प्रेमळ संवाद; प्रभाग 18 मधील क्षणाने अदिती पाटील कव्हेकर यांची विकासाची दृष्टी अधोरेखित

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप / लातूर ) – लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपच्या उमेदवार अदिती पाटील कव्हेकर यांना एक अविस्मरणीय आणि हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. प्रचाराच्या गडबडीत एका विशेष मुलाशी झालेला स्नेहपूर्ण व आत्मीय संवाद हा केवळ भेटीपुरता मर्यादित न राहता माणुसकीचा संदेश देणारा ठरला.

त्या मुलाचे निरागस हसू, निर्मळ भाव आणि दिलेला प्रेमळ प्रतिसाद थेट मनाला भिडणारा होता. या क्षणी राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता आणि आपुलकी किती मोठी असते, याची जाणीव उपस्थितांना झाली. अदिती पाटील कव्हेकर यांनीही या भेटीने भावूक होत, समाजातील प्रत्येक घटक आपला असून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच खरी सार्वजनिक सेवा असल्याची भावना व्यक्त केली.

“विकास म्हणजे केवळ रस्ते, पाणी आणि इमारती नाहीत; विकास म्हणजे माणसांना आपुलकीने जोडणे,” असे सूचक शब्द त्यांनी यावेळी बोलून दाखवले. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दुर्लक्षित घटकांसाठी संवेदनशील व सर्वसमावेशक विकास घडवण्याचा आपला दृष्टीकोन त्यांनी ठामपणे मांडला.

अशा खास भेटी प्रचाराच्या धावपळीतही अंतःकरणाला शांतता देतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी अधिक दृढ करतात. अदिती पाटील कव्हेकर यांचा हा मानवी दृष्टिकोन आणि विकासाची व्यापक संकल्पना लातूर मनपा निवडणुकीत भावनिक तसेच राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.