महाराष्ट्र खाकी ( छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागात अत्यंत निष्ठा, कर्तव्यतत्परता आणि उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील चार हवालदारांचा दिमाखदार राज्यस्तरीय सोहळ्यात सन्मान करण्यात आला आहे. हवालदार संजय रावसाहेब खेडकर, नारायण सोनवणे, अंबरसिंग कारभारी नागलोत तसेच सेवानिवृत्त हवालदार बाबासाहेब गायकवाड यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
येरवडा (पुणे) येथील कारागृह कर्मचारी भवनात ५ ऑगस्ट २०२६ रोजी या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कारागृह व सुधार सेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक सुहास वारके यांच्या हस्ते या चारही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
अभिमानास्पद कामगिरी
छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय व निष्कलंक कार्याची दखल घेण्यात आली. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांच्या सन्मानासाठी विशेष प्रस्ताव सादर करून योग्य तो पत्रव्यवहार करण्यात आला होता, ज्याची दखल घेत या चारही हवालदारांची राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड झाली.
या विशेष कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण २८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील चार हवालदारांनी बाजी मारल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली असून, कारागृहाच्या शिस्तप्रिय आणि उत्तम कामकाजाची राज्य पातळीवर पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे. या यशाबद्दल चारही हवालदारांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




