महाराष्ट्र खाकी (उमरगा / विवेक जगताप) – धाराशिव जिल्हा परिषद सदस्य तथा जन आरोग्य समितीचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी उमरगा तालुक्यातील नायचाकूर येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन जन आरोग्य समितीची बैठक घेत आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीदरम्यान आरोग्य केंद्राच्या विविध कामकाजावर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक दर्जेदार, प्रभावी व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर ठराव मांडण्यात आले. तसेच भविष्यातील कामकाजाबाबत महेश देशमुख यांनी आवश्यक सूचना करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायचाकूर आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नूर खलील चिद्रे यांनी आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख सेवा व उपक्रमांची माहिती दिली. सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे महेश देशमुख यांनी विशेष कौतुक करत केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या अभियानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. नूर खलील चिद्रे यांनी केंद्राच्या कामकाजाचा अहवाल सादर करत विविध विकासात्मक प्रस्ताव समितीसमोर मांडले.
यावेळी उपस्थित सदस्यांनी आरोग्य सुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महेश देशमुख यांनी केले.




