महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी )- प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्याने कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष
देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्रसरकारने आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी
सकारात्मकपणे पहावे. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचे स्वागत आणि समर्थन केले आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’चे समर्थन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु
त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्रसरकारने ते धाडस दाखविले आहे. देशातील अनेक राज्यात सातत्याने होत असलेल्या निवडणुकांमुळे शासन, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा वारेमाप खर्च होतो. सतत निवडणुका झाल्याने त्या कामात प्रशासनाचा
मौलिक वेळ वाया जातो. त्याचा विकासकामांना फटका बसतो. त्यामुळे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही आवश्यक बाब होती. ती भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडली होती. तिला मूर्त स्वरूप देण्याची वेळ आता आली आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल असे
स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले. विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून
मनापासून स्वीकारली जाईल, हा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचे स्वागत करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले आहे.