महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 24 व 25 मार्च 2023 या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, 26 मार्च 2023 रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. या कालावधीत
विजा कोसळण्याची शक्यता असल्याने सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विजांचा कडकडाट सुरु असताना घराबाहेर जाणे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करु नयेत. या कालावधीमध्ये विजा कोसळण्याची शक्यता जास्त
असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वत: सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यापासून
दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, अशा सुचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच या कालावधीत पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी आपले मुख्यालय सोडू नये, असे लातूरचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.