महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरील वकिलांच्या यादीत नाव नोंदणी करण्यासाठी ”अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड” ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. विधी क्षेत्रातील ही सर्वात कठीण परीक्षा असते. दरवर्षी केवळ 18 टक्के वकील ही परीक्षा उत्तीर्ण होतात. परीक्षेला पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयात पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी
प्रॅक्टीस करणे आवश्यक असते. यासोबत विधी व न्यायालयीन विविध विषयाचे अचूक आकलन लागते. लातूरच्या कन्या अॅड. प्रचिती देशपांडे-बेहेरे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. देशभरातून 253 वकिलांनी अॅडव्होकेट ऑन रेकार्ड या परीक्षेत यश मिळवले असून त्यात लातूरच्या अॅड. प्रचिती देशपांडे या मराठवाड्यातील पहिल्या महिला वकील आहेत. अॅड.
प्रचिती देशपांडे सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करत असून त्यांचे प्राथमिक शिक्षण येथील बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली व पुणे येथे झाले आहे. विधी विषयात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सुरवातीला पाच वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस केली. विवाहानंतर मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. प्रचिती येथील प्रसिद्ध विधिज्ञ डॉ. आर. आर. देशपांडे व
अॅड. उज्वला देशपांडे यांच्या कन्या आहेत. प्रचिती यांच्या अॅडव्होकेट ऑन रेकार्ड परीक्षेतील यशाच्या निमित्ताने आणखी एका लातूर पॅटर्नची भर पडली असून त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी पती कार्तिक बेहेरे, सासू, सासरे व आई-वडिलांना दिले आहे.