मुंबई पोलिसांसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी ATV वाहने मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुपूर्द

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी एटीव्ही (ऑल टिरेन व्हेईकल्स) वाहने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही दहा वाहने मार्गस्थ करण्यात आली. रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने ही वाहने देण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आलेली एटीव्ही वाहने सर्वसमावेशक अशी आहेत. यामुळे चौपाट्यांवरील सार्वजनिक उत्सव किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत देण्यासाठी, बचाव कार्यासाठी हे वाहन अतिशय उपयुक्त असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या सोहळ्यास पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या शिरीन कोतवाल आदी उपस्थित होते.