महाराष्ट्र

राज्याभर महाविकास आघाडी विरोधात भाजपाचं अनेक ठिकाणी निदर्शनं

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी, देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काल या प्रकरणी नवी दिल्लीत वार्ताहरांना प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार भ्रष्ट असून, त्यांना एका क्षणासाठीही सत्तेवर राहायचा अधिकार उरलेला नाही असं भाटिया यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरले असल्यानं, त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. देशमुख यांच्या कार्यकिर्दीत राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी देशमुख यांची नार्को चाचणी करावी अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे.

गृहमंत्र्यानी तात्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावं मागणीसाठी आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या वतीनं निदर्शनं केली गेली. अनिल देशमुख यांच्यावरच्या आरोपांमुळे राज्याचं गृह खातं  बदनाम झालं असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही केली. 

दरम्यान परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांविरोधात मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र कुणालातरी खुष करण्यासाठी पाठवलेलं असल्याचं आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील पाटील यांनी केला आहे. या पत्रातले आरोप अर्थहीन आणि खोटे असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

Most Popular

To Top