महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – शेतकऱ्यांच्या कष्टाच्या सोयाबीनवर आणि सर्वसामान्यांच्या गॅस सिलिंडरवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील एकूण ८ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत १५ गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यात शेतशिवारातून सोयाबीन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी विशेष पथक तैनात केले होते. या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून तिघा आरोपींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत या टोळीने लातूर जिल्ह्यातील देवणी, कासारशिरसी, उदगीर ग्रामीण, रेणापूर आणि औराद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ६ सोयाबीन चोरीचे गुन्हे, तसेच कर्नाटक राज्यातील हुलसूर (जि. बीदर) येथील २ गॅस सिलिंडर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. सोयाबीन विक्रीतून मिळालेली रोख रक्कम २,७६,००० रुपये, गुन्ह्यात वापरलेली फोर्ड फिगो कार ७०,००० रुपये, चोरीचे १५ गॅस सिलिंडर ३१,००० रुपये असा एकूण मुद्देमाल ३,७७,००० रुपये चा मिळाला.
या टोळीतील मुख्य आरोपी लालू उर्फ प्रदीप माधव कांबळे (वय २६, रा. बसपूर, ता. निलंगा) हा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील तब्बल १५ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. त्याच्या अटकेमुळे प्रलंबित असलेल्या इतर अनेक गुन्ह्यांचा तपास वेगवान होणार आहे. तिन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कार्यवाहीसाठी देवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कांचे, विजय पाटील, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, संतोष खांडेकर, शैलेश सुडे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे, दयाराम सूर्यवंशी, धनंजय गुट्टे आणि शिवराज अनंतवाड यांच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




