Home » महाराष्ट्र » मराठा बांधवांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हेल्पलाईन क्रमांक जारी, ​लेकरा-बाळांच्या भविष्यासाठी आणि एकजूट टिकवून राहण्यासाठी तरुणांना ‘मराठा सेवक’ होण्याचे आवाहन

मराठा बांधवांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हेल्पलाईन क्रमांक जारी, ​लेकरा-बाळांच्या भविष्यासाठी आणि एकजूट टिकवून राहण्यासाठी तरुणांना ‘मराठा सेवक’ होण्याचे आवाहन

महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप) – मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांसह इच्छुक नागरिकांना समाजसेवेत सहभागी करून घेण्यासाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

​उद्देश आणि भूमिका
​दसरा मेळाव्याच्या दिवशी मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी एक मोठी टीम उभी करण्याचा विचार मनोज जरांगे पाटील यांनी मांडला होता. समाजातील मुलांच्या भविष्यासाठी आणि समाजाच्या प्रश्नांसाठी राज्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून काम करणारे सेवक तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राजकारणापेक्षा समाजहित महत्त्वाचे मानून काम करण्याची गरज असून, समाजाची प्रगती, लहान मुलांचे व तरुणांचे भविष्य सुरक्षित करणे आणि एकजूट टिकवणे हा ‘मराठा सेवक’ म्हणून काम करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​मराठा सेवक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी ९४२१९२२२२२ हा संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे. ​या क्रमांकावर इच्छुकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि सध्या कोणते कार्य करतात, याची माहिती संदेशाद्वारे (WhatsApp द्वारे) पाठवायची आहे. या क्रमांकावर थेट फोन करू नये, असे स्पष्ट निर्देश मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत.

​उपोषण आणि सभांच्या ठिकाणी मराठा सेवकांनी सक्रिय राहावे
​समाजसुधारणेसाठी आणि समाजाच्या हितासाठी ज्या-ज्या ठिकाणी उपोषणे, सभा किंवा इतर सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील, त्या ठिकाणी मराठा सेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील लोकांना जागृत करून त्यांना एकत्र आणण्याचे काम सेवकांनी करावे. कोणतीही स्वार्थी भावना मनात न ठेवता, कितीही अडचणी आणि संकटे आली तरी प्रामाणिकपणे समाजाच्या हितासाठी काम करण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ​या उपक्रमामुळे राज्यभरातून मराठा सेवकांचे मोठे जाळे विस्तारले जाणार आहे.

Share This News

Related Post

National