महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – शहरातील सर्वात वर्दळीचे आणि मुख्य ठिकाण असलेल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अगदी नाकाखाली जुन्या रेल्वे लाईन रोडवरील एका ऑनलाईन लॉटरीच्या दुकानात खुलेआम बेकायदेशीर मटका जुगार सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्थेचे ढोंग रचले जात असताना, दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या अर्थपूर्णदुर्लक्षा मुळे आणि आशीर्वादानेच हा अवैध धंदा बिनधास्त सुरू असल्याची चर्चा आहे.
काही महिन्यांपूर्वीच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या हातात आला. मात्र, त्यांच्या कार्यकाळातच पोलीस स्टेशनच्या हाताच्या अंतरावर असा पोलिसांना आव्हान देणारा अवैध धंदा मटका सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कडक धोरण राबवत असताना, त्यांच्या या भूमिकेला लातूरमधील स्थानिक अधिकारीच हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत हवी तशी कारवाई होत नसल्यानेच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी येथे अतिरिक्त पोलीस निरीक्षक म्हणून कामत यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागली का? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ मटका चालत असूनही संबंधित बिट अंमलदार आणि डीबी (DB) पथकाच्या कर्मचाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे काय होऊ शकते? हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, हा प्रकार पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याही गळ्यात उतरणारा नाही. एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांना नियमांचे धडे देणारी पोलीस , आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर चालणाऱ्या अवैध मटका जुगाराकडे डोळेझाक करणारी यंत्रणा, यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे.




