महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर नांदेड पथकाचा सर्जिकल स्ट्राईक! लातुरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यांवर धाड; १८ जण जाळ्यात, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यातील काही स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे आणि खाबुगिरीमुळे लातूर जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर विशेष पथकाने धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे. स्थानिक पोलिसांच्या हातावर तुरी देत, पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नांदेडवरून आलेल्या विशेष पथकाने लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकून हा धडक दणका दिला. या संपूर्ण कारवाईत तब्बल १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ६२ लाख ५१ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, मुरुड आणि जळकोट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका, तिरंट नावाचा जुगार आणि अवैध वाळू उपसा सर्रास सुरू होता. स्थानिक पोलिसांना या अवैध धंद्यांची माहिती असूनही त्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे हे माफिया मोकाट फिरत होते. अखेर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथकाला थेट मैदानात उतरवले.
1) MIDC हद्दीतील मटका बुकी उद्ध्वस्त – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच दिगंबर चौकातील दगडू शेठ यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर धाड टाकण्यात आली. या कारवाईत ६६,८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ इसमांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2) मुरुडमध्ये तिरंट जुगारावर धाड – मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंकरनगर येथील अप्पा मस्के यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरंट जुगारावर छापा मारून २,८०,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ६ जणांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
3) जळकोटमध्ये वाळू माफियांचे कंबरडे मोडले – सुल्लाळी शिवारातील तिरू नदीच्या पात्रातून पोकलेनच्या साह्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर रात्री २३:५५ वाजता धाड टाकण्यात आली. घटनास्थळावरून १ पोकलेन मशीन, २ ट्रॅक्टर आणि वाळू असा तब्बल ५९,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३ जणांवर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तिन्ही कारवायांमध्ये मिळून १८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २७,९२० रुपये रोख, १९ मोबाईल, १ पोकलेन मशीन आणि २ ट्रॅक्टर असा एकूण ६२,५१,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे आणि गजानन ढवरे यांच्या पथकाने केली असून त्यांच्या या धडक कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.
हेल्पलाइनवर माहिती देण्याचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचे आवाहन
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 ही ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती या क्रमांकावर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.




