महाराष्ट्र खाकी ( मुंबई / विवेक जगताप ) – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व विभाग (गोवंडी) कार्यालयात भ्रष्टाचाराचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. पिंका आर्मी योजनेअंतर्गत व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छता कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी चक्क ३ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर आणि एका खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींमध्ये सहाय्यक अभियंता गणेश हणमंतराव चांदोलकर, उपअभियंता अविनाश दत्तात्रय दूधभाते आणि खाजगी इसम विनीत खाडे यांचा समावेश आहे.
तक्रारदाराने एम/पूर्व विभाग, म.न.पा. गोवंडी यांच्या हद्दीतील ‘पिंक आर्मी’ योजना व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी सहाय्यक अभियंता गणेश चांदोलकर आणि उपअभियंता अविनाश दूधभाते यांनी तक्रारदाराकडे ३,५०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने तक्रारदाराने ५ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), मुंबई येथे थेट तक्रार नोंदवली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ मे २०२६ रोजी केलेल्या पडताळणीदरम्यान लोकसेवक गणेश चांदोलकर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. उपअभियंता अविनाश दूधभाते व खाजगी इसम विनीत खाडे यांनीही लाचेची मागणी केली आणि विनीत खाडे याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी ला.प्र.वि. मुंबई विभाग येथे ३० सप्टेंबर २०२६ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ आणि ७(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना कलम ३५(३) भा.ना.सु.सं. अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
या कारवाईतील पडताळणी अधिकारी रजनी उंबरकर (पोलीस निरीक्षक) आणि पर्यवेक्षक अधिकारी प्रविण पावले (सहाय्यक पोलीस आयुक्त) हे आहेत. तसेच पडताळणी पथकात पो.ह. तेली, पाडले, गवरणे, तोडणकर, खामळे, मपोशि. नलावडे, भुजबळ आणि पो.शि. साबळे यांचा समावेश होता. ही संपूर्ण कारवाई संदिप दिवाण (अपर पोलीस आयुक्त, ला.प्र.वि., मुंबई), अनिल घेरडीकर (अपर पोलीस उप आयुक्त-१) आणि अनंत साळुंके (अपर पोलीस उप आयुक्त-२) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.




