Home » प्रशासकीय » वलांडी येथील ४० गावांच आरोग्य केंद्र ‘आजारी’… रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आणि प्रशासनंची उदासीनता

वलांडी येथील ४० गावांच आरोग्य केंद्र ‘आजारी’… रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आणि प्रशासनंची उदासीनता

महाराष्ट्र खाकी (निलंगा / विवेक जगताप ) – कर्नाटक सीमेवरील वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्र आता स्वतःच आजारी पडलंय! रिक्त पदे, अपुरे मनुष्यबळ, औषधांचा तुटवडा आणि दररोज २०० ते बाजारदिवशी ४०० रुग्णांची गर्दी, ४० गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेलं हे केंद्र आज पूर्णपणे कोलमडलेलं आहे. पण प्रशासन आणि जिल्हा परिषद मात्र अजूनही डोळेझाक करत आहे. वलांडी PHC मध्ये मेडिकल ऑफिसर, आरोग्य सेविका, शिपाई, तंत्रज्ञ अशी अनेक पदे रिक्त आहेत. मनुष्यबळ आणि सुविधांअभावी आरोग्यसेवा कोलमडली आहे. दररोज २०० हून अधिक रुग्ण येतात, शुक्रवारी-शनिवारी तर ४०० रुग्णांची गर्दी होते. औषधांचा तुटवडा इतका की रुग्णांना बाजारातून महागड्या किमतीत औषधे खरेदी करावी लागतात. रक्त तपासणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने रुग्णांना खासगी लॅबमध्ये पैसे खर्च करावे लागतात.

कर्नाटक सीमेवरील नागरिकही उपचार, प्रसूती आणि इतर आरोग्य सेवांसाठी येथे येतात. एवढा मोठा रुग्णभार असतानाही वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, शिपाई, तंत्रज्ञ अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण आहे. जवळचा, धनेगाव, कवठ्याळा, वडमुखी, दगडहिपपरगा आदी उपकेंद्रातील नागरिक या केंद्रावर अवलंबून आहेत. पण केंद्रच ‘आजारी’ असल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत.

जिल्हा परिषद बैठकीत अशाताई पाटील यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांनी थेट प्रश्न केला – “आरोग्य केंद्र की रेफरल केंद्र?” खर्च वाढत असतानाही प्रसूती सेवांबाबतची सुरक्षितता आणि आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न अनुत्तरीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनीही केंद्रातील मोठी रिक्तपदे मान्य केली आहेत. पण मंजुरी झालेल्या पदांवर कामकाजाचा भार असतानाही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. औषधसाठ्यातही सातत्याने तुटवडा आहे.

हे फक्त एक आरोग्य केंद्र नाही. हा हजारो नागरिकांच्या जिवाचा प्रश्न आहे. प्रशासनाने तात्काळ रिक्त पदे भरावीत, औषधसाठा उपलब्ध करून द्यावा आणि मनुष्यबळ वाढवावे. अन्यथा वलांडी PHC ‘आजारी’ राहिलं तर आसपासच्या ४० गावांतील आरोग्य व्यवस्थाच कोलमडेल. महाराष्ट्र खाकी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते – आरोग्य विभागाचे डोळे कधी उघडणार?

Share This News

Related Post

National