Home » राजकीय » Manoj jarange patil मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा १२ वा दिवस… लातूरचे ६ आमदार-१ खासदार गायब, मराठा मतदार ही गोष्ट विसरणार नाहीत

Manoj jarange patil मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा १२ वा दिवस… लातूरचे ६ आमदार-१ खासदार गायब, मराठा मतदार ही गोष्ट विसरणार नाहीत

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२वा दिवस उजाडला आहे. राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी जाऊन भेट देत आहेत, पाठिंबा देत आहेत. पण लातूर जिल्ह्यातील सहा आमदार आणि एक खासदार यांनी मात्र जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. हेच ते लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत जरंगे पाटलांना मदत मागण्यासाठी साकडे घातले होते. कोणी उघडपणे, तर कोणी लपूनछपून मदत घेतली होती. निवडणूक झाली, सत्ता मिळाली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरंगे पाटील दोघांनाही विसरून गेले!

अमित देशमुख, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी जरंगे पाटलांच्या उपोषणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. उपोषणस्थळी जाण्याची तर सोडाच, वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्याची तसदी घेतली नाही. जेव्हा मदत हवी होती तेव्हा पाटलांच्या दारात उभे राहिले, आता आरक्षणाच्या लढ्यात मात्र गायब!

ही निव्वळ राजकीय सोयीची खेळी आहे. निवडणुकीत मराठा मतदारांचे आणि जरंगे पाटलांच्या समर्थनाचे भांडवल करून सत्ता मिळवली आणि आता मुद्दाच सोडून दिले. लातूर जिल्ह्यातील मराठा मतदार आणि जरंगे पाटलांना मानणारा वर्ग ही गोष्ट नक्की लक्षात ठेवेल. जेव्हा पुन्हा मदत लागेल तेव्हा याच लोकांना आठवण येईल की, उपोषणाच्या दिवसात कोण कोणाच्या बाजूने उभे राहिले होते आणि कोणाने पाठ फिरवली होती.

मराठा आरक्षणाचा लढा चालू असताना लोकप्रतिनिधींची ही उदासीनता मराठा समाजाच्या भावनांवर घाव घालणारी आहे. निवडणुकीत मदत घेऊन नंतर विसरणे ही राजकारणाची खरी ओळख आहे का? लातूरचे हे नेते आताच सावध व्हावेत, नाहीतर मतदारांची आठवण फार काळ टिकणार नाही.

Share This News

Related Post

National

Latur police रेणापूर ते निलंगा… चार ठाण्यांच्या हद्दीत जुगार-मटका खुलेआम चालत होते, तरीही संबंधित पोलीस निरीक्षकांना काहीच कळलं नाही? म्हणून DIG पथकाने जुगार-मटका अड्ड्यांवर छापे टाकत केली कारवाई