महाराष्ट्र खाकी ( प्रतिनिधी / पुणे ) – लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, संसदरत्न प्रो.डॉ. ॲड. सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे येथे त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कुंतल अरोरा यांनी लिहिलेला “पार्लियामेंट टू सुप्रीम कोर्ट” आणि डॉ. सुनील गायकवाड यांचे आत्मचरित्र “माझा संसदेतील प्रवास” या दोन्ही ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. सुनील गायकवाड यांनी भावनिक शब्दांत म्हटले, “आयुष्यात काही नाती रक्ताची नसतात, पण ती मनाने जोडली जातात. कुंतल अरोरा यांचे प्रेम, विश्वास आणि माझ्या प्रवासाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ही माझ्यासाठी आयुष्यभराची अमूल्य देणगी आहे. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.” “जीवनातील खरी संपत्ती म्हणजे मिळालेली माणसे, त्यांचे प्रेम आणि आपुलकी हेच असते,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन कुंतल अरोरा, सिमरन अरोरा आणि वंशिका अरोरा यांनी केले. कार्यक्रमात सिने अभिनेते राणा जंग बहादूर, माजी मंत्री दिलीप कांबळे, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, डॉ. अनिलकुमार गायकवाड, जयश्री अनिलकुमार गायकवाड, विशाखा सुनील गायकवाड व इतर अनेक मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्नेहीजन उपस्थित होते.
विशेष आकर्षण ठरली ती डॉ. सुनील गायकवाड यांचे मोठे बंधू डॉ. अनिलकुमार गायकवाड आणि वहिनी जयश्री गायकवाड यांची उपस्थिती. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने हा सोहळा अधिक भावनिक आणि स्मरणीय झाला. डॉ. सुनील गायकवाड यांच्या संघर्षपूर्ण जीवनप्रवासावर आधारित हे दोन्ही ग्रंथ भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



