महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडणारे, लाखो फॉलोवर्स असलेले त्रिशूल पाटील यांचे सोशल मीडिया अकाउंट काही व्यक्तींच्या तक्रारीवरून बॅन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेची दुटप्पी आणि संशयास्पद भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे, कोणाचेही नाव न घेता केवळ मराठा समाजाचा आवाज बुलंद केल्यामुळे त्रिशूल पाटील यांचे सहावे अकाउंट प्रशासनाने बॅन केले आहे.
“मी माझे काम थांबवणार नाही” – त्रिशूल पाटील यांचा प्रखर निर्धार
अकाउंट बॅन होण्याच्या या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त करताना त्रिशूल पाटील यांनी ठणकावून सांगितले की “मी कोणाचेही नाव घेतलेले नाही, तरीही माझे अकाउंट बंद केले गेले. हे माझे सहावे अकाउंट बंद करण्यात आले आहे; परंतु, या असल्या कारवायांमुळे मी माझे काम थांबवणार नाही, तर आणखीन ताकतीने आणि जोमाने मराठा समाजासाठी लढा सुरूच ठेवीन”
सामान्य जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, मग त्रिशूल पाटलांवर ही तत्परता का?
या संपूर्ण प्रकारामुळे सामान्य जनतेच्या आणि मराठा बांधवांच्या मनात प्रशासनाबद्दल तीव्र शंका उपस्थित होत आहेत. राज्यात लाखो नागरिक आपल्या हक्कांच्या आणि न्याय्य मागण्यांच्या तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवतात, पण प्रशासन त्यांची साधी दखलही घेत नाही.
अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी तक्रारीसाठी प्रचंड पाठपुरावा केला, तरीही या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील गंभीर तक्रार नोंदवून घेण्यासाठीही यंत्रणेने टाळाटाळ केली मग त्रिशूल पाटील यांच्या बाबतीत इतकी तत्परता का ?
सामान्यांच्या किंवा मोठ्या नेत्यांच्या गंभीर तक्रारींवर महिनोन्महिने मूग गिळून बसणारे सरकार आणि प्रशासन, त्रिशूल पाटलांच्या बाबतीत मात्र इतकी अतिसतर्कता आणि तत्परता कशी दाखवते? हाच संतप्त सवाल आता सामान्य जनता आणि मराठा समाज विचारत आहे.
जनतेत वाढता असंतोष
एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप होत आहे. सरकार आणि प्रशासनाच्या या निगरगट्ट व पक्षपाती कार्यपद्धतीमुळे राज्यातील जनतेमध्ये आणि विशेषतः मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.




