महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड शहरात मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे. या अत्यंत संवेदनशील आणि दुःखद पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. यंदाचा आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारचा जल्लोष, उत्सव किंवा शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
दुःखात सहभागी होत वाढदिवसाचा जल्लोष टाळला
मोशी येथील दुर्घटनेत आपल्या नऊ सहकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे निधन झाले. या भीषण दुर्घटनेमुळे निर्माण झालेली शोककळा लक्षात घेता, “ज्या कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष किंवा जवळचे नातेवाईक गमावले आहेत, त्यांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत,” अशी भावना महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला असून, कार्यकर्त्यांना व नागरिकांना मोठा संदेश दिला आहे.
महापौर रवी लांडगे यांचे नागरिक व कार्यकर्त्यांना विशेष आवाहन
महापौर रवि लांडगे यांनी आपल्या सर्व मित्रपरिवार, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना एक नम्र आवाहन केले आहे:
1) जल्लोष टाळावा: वाढदिवसानिमित्त होणारे स्वागत समारंभ, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शक्तिप्रदर्शन पूर्णपणे टाळावे.
2) बॅनर-होर्डिंग्स नको:शहरात वाढदिवसाचे अभिनंदपर बॅनर्स, फ्लेक्स किंवा होर्डिंग्स लावण्यात येऊ नयेत.
3) पुष्पगुच्छ टाळावेत: वाढदिवसाच्या भेटी म्हणून हार किंवा पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाहीत.
महापौर रवी लांडगे यांनी जल्लोषाऐवजी समाजोपयोगी उपक्रमांची हाक दिली
वाढदिवसावर होणारा खर्च किंवा औपचारिकता टाळून त्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
रक्तदान शिबिरे, आयोजित करणे, गरजू व अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य देणे,अशा उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचे महापौर रवी लांडगे यांनी आवाहन केले आहे. एका लोकप्रतिनिधीने व पदाधिकाऱ्याने घेतलेला हा निर्णय राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अत्यंत कौतुकास्पद ठरत असून, संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाचे दर्शन यातून घडत आहे.




