महाराष्ट्र खाकी (पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत चिखली परिसरातील पिंगळे रोड येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेवक स्वर्गीय दत्ताकाका साने यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना या पर्यावरणपूरक उपक्रमाने अभिवादन करण्यात आले.
‘दत्ताकाकांचा वारसा पुढे नेणार’ – नगरसेवक यश साने
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना नगरसेवक यश साने म्हणाले, “दत्ताकाकांनी आपल्या कार्यातून समाजसेवेचा आणि विकासाचा एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या पाऊलवाटेवर चालताना आज लावलेले प्रत्येक रोप हे हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहराच्या निर्मितीचा आमचा संकल्प आहे.”
पुढे बोलताना नगरसेवक यश साने यांनी विश्वास व्यक्त केला की, दत्ताकाकांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेत, प्रभागाच्या विकासासोबतच पर्यावरण संवर्धनालाही सदैव प्रथम प्राधान्य दिले जाईल.
या कार्यक्रमास नगरसेविका सौ. संगीतानानी ताम्हाणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करून परिसर हिरवागार ठेवण्याचा निश्चय केला.




