महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – नीट पेपर लिक प्रकरणात खासदार डॉ. काळगे यांनी केलेल्या राजकारणावर आमदार अभिमन्यू पवार यांनी हल्ला चढवला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी खडकून सांगितले की, “RCC क्लासेसचे प्रमुख मोटेगावकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत! मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उघड उघड काँग्रेसचा प्रचार केला आणि अमित देशमुख यांच्या प्रचारसभेतही ते हजर होते.” यासंदर्भात त्यांनी पुरावा स्वरूपात व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे.
आमदार अभिमन्यू पवार म्हणाले
“खासदार डॉ. काळगे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यक्ती पेपरफुटी प्रकरणात अटक होतात, तेव्हा त्यांना राजकारण दिसेनासे होते. काँग्रेस पक्षाने या प्रकरणात केलेले आरोप-प्रत्यारोपाचे हे राजकारण केवळ आश्चर्यकारक नाही तर अतिशय हास्यास्पद आणि लाजिरवाणे आहे.”
आमदार अभिमन्यू पवार यांचा कडक इशारा
“लातूर पॅटर्नला काळिमा फासणारे हे प्रकरण आहे. शाहू कॉलेज, दयानंद महाविद्यालय, केशवराज विद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर यांसारख्या अनेक संस्थांच्या कष्टाने उभारलेल्या लातूरच्या शैक्षणिक कीर्तीला या पेपरफुटीने भयंकर ठेच पोहोचवली आहे.
13 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेल.”
आमदार पवार यांनी खासदार डॉ. काळगे यांना थेट लक्ष्य करत म्हटले,
“आता पुरे झाले खासदार साहेब! फक्त राजकारण करणे सोडा. आरोप-प्रत्यारोपाच्या गलिच्छ राजकारणात न पडता, लातूरकर म्हणून सर्वांनी या प्रकरणाचे गांभीर्याने चिंतन करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करायला हवा.” या आक्रमक भूमिकेनंतर लातूर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून, आमदार अभिमन्यू पवार यांनी खासदार डॉ. काळगे यांना खुली आव्हान दिले आहे.



