महाराष्ट्र खाकी ( कासार शिरशी / विवेक जगताप ) – दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाच्या जिवावर उठलेल्या चोरट्याला API प्रताप गर्जे यांनी दाखवला पोलिसी खाक्या; कासार शिरशी पोलिसांचा ‘दणका’, मोटर चोराच्या मुसक्या आवळल्या, एकीकडे भीषण दुष्काळाच्या सावटाखाली जगणारा शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी दिवस-रात्र धडपडत आहे, तर दुसरीकडे अशाही बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी लांबवणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र, अशा निष्पाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या चोरांचा कासार शिरशी पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक (API) प्रताप गर्जे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने धडक कारवाई करत पाण्याच्या मोटारी लांबवणाऱ्या अट्टल चोराला बेड्या ठोकल्या आहेत!
मिळालेल्या माहितीनुसार, कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील पाण्याच्या मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.क्र. २५४/२०२६, कलम ३०३(२) BNS) होताच, पोलीस प्रशासनाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत कासार शिरशी पोलीस पथकाने कसून शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी महेश शंकर पाटील (रा. बामणी) याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्या दाखवताच आरोपीची बोलती बंद झाली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेली पाण्याची मोटार जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
ही धडक कारवाई सपोनि प्रताप गर्जे , आबासाहेब इंगळे, अमोल दूधभाते आणि इंद्रजीत चेलकर यांच्या पथकाने केली आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या अशा चोरांचा बिमोड केल्याबद्दल कासार शिरशी पोलीस पथकाचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.




