महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या रणनीती बैठकीत लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी विकासाभिमुख व सकारात्मक भूमिका मांडली. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत नियोजनबद्ध काम करण्याचा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“लातूरचा विकास हा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दूरदृष्टी, पारदर्शकता आणि लोकसहभाग आवश्यक आहे. शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रोजगारनिर्मिती या सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून लातूरचा सर्वांगीण विकास साधणार आहोत,” असे गोजमगुंडे यांनी सांगितले.
विकासाभिमुख आणि लोककेंद्री धोरणांवर भर देत, सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा केंद्रस्थानी ठेवून महापालिकेचे कामकाज अधिक सक्षम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. अनुभवी नेतृत्व, सक्षम संघटना आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर लातूर शहराला प्रगतीच्या नव्या दिशेने नेण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकीत मांडलेल्या विचारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासात्मक भूमिका अधिक ठळकपणे समोर आली असून, लातूरच्या विकासासाठी एकजुटीने आणि ठोस नियोजनासह निवडणुकीला सामोरे जाण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.


