Home » महाराष्ट्र » Latur police “रोग एकीकडे, इलाज दुसरीकडे!”; लातूरमध्ये हेल्मेट सक्तीवरून नागरिक हक्क संघर्ष समिती आक्रमक

Latur police “रोग एकीकडे, इलाज दुसरीकडे!”; लातूरमध्ये हेल्मेट सक्तीवरून नागरिक हक्क संघर्ष समिती आक्रमक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) — जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्तीविरोधात नागरिक हक्क संघर्ष समिती आक्रमक झाली असून, प्रशासनाच्या या तुघकली निर्णयाविरोधात रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर सुरक्षेच्या कारणास्तव हेल्मेट सक्ती योग्य असली, तरी शहरांतर्गत भागात ही सक्ती लादणे नागरिकांच्या जिवावर उठणारे आणि नाहक त्रास देणारे ठरणार आहे, असा ठाम पवित्रा समितीने घेतला आहे.

शहरातील दैनंदिन व्यवहारांचा विसर पडून प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बाजारात भाजीपाला आणण्यासाठी जाणे असो, बँकेतील तातडीचे व्यवहार असोत किंवा किरकोळ कामे असोत; प्रत्येक वेळी दुचाकीस्वारांना सोबत हेल्मेट बाळगणे आणि ते सुरक्षित सांभाळणे अवघड असते. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांचा वेग तसाही अतिशय मर्यादित असतो. त्यामुळे महामार्गाचा निकष शहराला लावणे पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे.

पोलिसांच्या या धरसोड वृत्तीवर ताशेरे ओढताना नागरिक हक्क संघर्ष समितीने थेट शब्दांत म्हटले आहे की, “रोग एकीकडे आणि इलाज दुसरीकडे,” अशी प्रशासनाची गत झाली आहे. रस्त्यांवरील जीवघेणी अतिक्रमणे हटवणे, चौकाचौकांत विस्कटलेली वाहतूक सुरळीत करणे, बेशिस्त वाहतुकीला आळा घालणे आणि शहरात विनापरवाना सुसाट धावणारी अवैध वाहतूक थांबवणे या मूलभूत मुद्यांवर काम करण्याऐवजी पोलीस प्रशासन केवळ सोपा मार्ग म्हणून सामान्य नागरिकांच्या खिशातून दंड वसुलीचा सोपा मार्ग शोधत असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे.

शहरातील या मनमानी हेल्मेट सक्तीची दखल जिल्हा प्रशासनाने तातडीने घ्यावी, अन्यथा याविरोधात तीव्र सनदशीर मार्गाने आंदोलन उभारले जाईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता पाहता, प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी नागरिक हक्क संघर्ष समिती आता आक्रमक पावले उचलत असून, लवकरच जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन  विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप** यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. प्रशासनाने जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी हा निर्णय मागे घ्यावा, असे परिपत्रकात स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

Share This News

Related Post

National