महाराष्ट्र खाकी ( सांगली / विवेक जगताप ) – आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत हजारो गरजू रुग्णांना सातत्याने मदतीचा हात देणारे लोकप्रिय आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना आगामी पुणे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे आमदार व शिक्षक बांधव एकत्रितपणे साकडे घालणार आहेत.
मिरज येथे ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’च्या वतीने आयोजित विशेष शिक्षक व आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे (वर्च्युअॅल) उपस्थित उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जनसेवेचा गौरव आणि विधिमंडळातील सहभागाची गरज
या प्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर व आमदार सुहास बाबर यांनी मंगेश चिवटे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “शिक्षक, शिक्षण संस्था आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी श्री. मंगेश चिवटे नेहमीच अग्रस्थानी असतात. गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यापासून ते शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा धडाडीच्या आणि जनसेवेचा वसा घेतलेल्या कार्यकर्त्याचा आवाज विधान परिषदेत पोहोचणे काळाची गरज आहे.”
आमदार आणि शिक्षक संघटनांची संयुक्त शिष्टाई
मंगेश चिवटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेची संधी मिळावी, यासाठी शिवसेनेचे सर्व संबंधित आमदार तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावी वाचा फोडण्यासाठी आणि चिवटे यांच्या तळागाळातील अनुभवाचा फायदा प्रशासनाला व शासनाला व्हावा, यासाठी या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे या शानदार सोहळ्यातून स्पष्ट झाले.




