लातूर जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी आमदार अभिमन्यू पवार यांची पोलीस महासंचालकांशी सकारात्मक चर्चा

महाराष्ट्र खाकी – (औसा / विवेक जगताप) – औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची सदिच्छा भेट घेत लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. मतदारसंघासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार पवार यांनी प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य व्हाव्यात, या दृष्टीने सकारात्मक वातावरणात चर्चा केली असून लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या भेटीत लातूर, धाराशिव, बीड व नांदेड जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट मंजूर करून कार्यान्वित करण्याची मागणी आमदार पवार यांनी विशेषत्वाने मांडली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सकारात्मक भूमिका घेत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी पोलीस महासंचालकांना दिली.

तसेच निलंगा तालुक्यातील कासार शिरशी पोलीस ठाण्याचे दर्जोन्नतीकरण करण्याची मागणी करण्यात आली. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सहा गावांमुळे नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन ही गावे पुन्हा निलंगा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

याशिवाय मदनसुरी (ता. निलंगा) येथे पोलीस दुरक्षेत्र (आऊट पोस्ट) मंजूर करून कार्यान्वित करण्याची मागणीही मांडण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लातूर जिल्ह्याच्या पोलीस व्यवस्थेला अधिक बळ मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. या चर्चेमुळे लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Recent Posts