ई-गव्हर्नन्समध्ये लातूरचा डंका! जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र खाकी (लातूर/ विवेक जगताप) –  राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्थान पटकावले आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिकाभिमुख बनवणे हा होता. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने १ जून २०२५ पासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली होती. यात संकेतस्थळ सुधारणा, सेवा हमी कायदा (आरटीएस), ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तसेच जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश होता.

मूल्यमापनात लातूर जिल्ह्याने २०० पैकी १७९.२५ गुण मिळवून राज्यातील टॉप ५ मध्ये स्थान मिळविले. (या यादीत जळगाव, ठाणे, धाराशिव, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने राबवलेल्या या उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. या यशामुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात…
“१५० दिवसांच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना सेवा अधिक गतीने आणि अचूकपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा कल्पक वापर करून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान केले. ही संपूर्ण टीमची कामगिरी आहे,” असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. टीम वर्क आणि तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाने एक आदर्श निर्माण केला आहे.

Recent Posts