महाराष्ट्र खाकी (नांदेड / विवेक जगताप) – महाराष्ट्र राज्य शासनाच्या १५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस परिक्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ७ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमात संकेतस्थळ सुधारणा, आपले सरकार पोर्टल, ई-ऑफिस, डेटा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, AI, Blockchain आणि GIS सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कार्यालयांना अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख बनवण्यावर भर देण्यात आला होता. कार्यक्रमाची मुदत १० जानेवारी २०२६ रोजी संपल्यानंतर भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांनी स्वतंत्र मूल्यमापन केले.
नांदेड परिक्षेत्राने यात उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये नवीन संकेतस्थळ विकसित करणे, तक्रारींची विहित वेळेत सोडवणूक, कागदविरहित फाईल निपटारा, इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड, ‘संवेदना’ (AI आधारित अर्ज चौकशी प्रणाली), Feedback सुविधा, ‘Eagle Eye’ (गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख) आणि गैरप्रकारांच्या निर्मूलनासाठी ‘खबर’ हेल्पलाइन (९१५०१००१००) यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश होता.
यापूर्वी १०० दिवसांच्या कृती आराखड्यातही नांदेड परिक्षेत्राने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता. बक्षीस वितरण समारंभात शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “या यशामागे परिक्षेत्रातील सर्व अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी तसेच Rythmbytes कंपनीचे हर्षानंद शर्मा, SETTribe कंपनीचे सारंग वाकोडीकर, शहेबाज खान आणि पोलीस अंमलदार दीपक पवार यांचे अहोरात्र परिश्रम आहेत. प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.”
या यशाने नांदेड परिक्षेत्रातील डिजिटल सुधारणेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचे परिक्षेत्राचे ध्येय आहे.







