धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा गौरव, ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा

महाराष्ट्र खाकी ( धाराशिव / विवेक जगताप ) – राज्य शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री Ashish Shelar, मुख्य सचिव Rajesh Agrawal, पोलीस महासंचालक Sadanand Date यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या कुशल नेतृत्व, दूरदृष्टी आणि परिणामकारक नियोजनामुळे धाराशिव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख केले असून याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.

१५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आल्या. यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड, ‘तुळजाई’ चॅटबॉट, ‘कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर’ प्रणाली तसेच ‘जीवनरेखा’ प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे. डिस्ट्रिक्ट डॅशबोर्डमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले असून निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. ‘कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर’ प्रणालीमुळे शासन निर्णय व परिपत्रकांची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक अचूक व जलद झाले आहे.

‘जीवनरेखा’ प्रणालीद्वारे शेत रस्त्यांची नोंद व व्यवस्थापन सुलभ झाले असून ग्रामीण भागातील तक्रारींचे प्रभावी निराकरण होत आहे. तुळजाई चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असून सेवा वितरण अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या व्यापक वापरामुळे ‘पेपरलेस कार्यालय’ संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे.

या यशामागे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नमूद केले. त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात मिळवलेले हे यश कौतुकास्पद मानले जात आहे.

Recent Posts