महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत असताना नेतेमंडळींमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जुन्या भाषणातील वक्तव्ये काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त प्रतिक्रिया देत निलंगेकरांनी आक्रमक शब्दांत अमित देशमुखांवर पलटवार केला आहे.
“मर्दूमकीची भाषा आमच्याशी करू नका. शब्द वापरताना मर्यादा ठेवा,” असा थेट इशारा निलंगेकरांनी दिला. “मी अमित देशमुख यांना स्पष्ट आवाहन करतो—भाषेची मर्यादा पाळा. अन्यथा आम्ही लातूरमध्ये येऊन तुमचं सगळं रेकॉर्ड बाहेर काढू,” असे खडेबोल सुनावत त्यांनी राजकीय वातावरण अधिक तापवले.
या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, पुढील काळात आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






