महाराष्ट्र खाकी ( लातूर | विवेक जगताप ) – लातूरच्या राजकारणात १९९५ साली कव्हेकरांनी घडवून आणलेल्या ऐतिहासिक राजकीय उलथापालथीची आठवण पुन्हा एकदा ताजी होत असून, २०२९ मध्ये तशीच राजकीय उलथापालथ विक्रांत गोजमगुंडे घडवतील , अशी चर्चा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या सध्याच्या राजकीय हालचाली, नियोजनबद्ध राजकीय डावपेच आणि महानगरपालिका निवडणुकीत लातूरकरांसमोर उभा राहिलेला तिसरा प्रबळ पर्याय हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
महापौर असताना विक्रांत गोजमगुंडे यांनी महिलांसाठी सुरू केलेली मोफत सिटीबस योजना ही त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाची व लोकाभिमुख योजना ठरली. या योजनेचा आदर्श घेत राज्य सरकारनेही त्याची दखल घेतली, हे त्यांच्या कामाची पावती मानली जाते. त्यांच्या महापौर काळातील कामाचा वेग आणि प्रभाव पाहून लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एका कार्यक्रमात यांनी उघडपणे “विक्रांत गोजमगुंडे यांचे काम पाहता ते आमदार झाले पाहिजेत ” असा सूचक उद्गार काढल्याची चर्चा आजही शहरात होते.
सध्याच्या राजकीय हालचाली, निवडणुकीतील रणनीती आणि जमिनीवर दिसणारी ताकद पाहता, लातूर शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लातूरकरांसाठी एक तिसरा प्रबळ पर्याय म्हणून विक्रांत गोजामगुंडे यांनी पुढे आणला आहे. अनेकांच्या मते, विक्रांत गोजमगुंडे यांच्या नेतृत्वामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लातूरमध्ये नवी संजीवनी मिळाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, लातूर महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई न राहता विक्रांत गोजमगुंडे यांच्यासाठी आगामी विधानसभेची ‘ट्रायल’ आहे. त्यांच्या राजकीय हालचालींवरून आणि वाढत्या चर्चांवरून लातूरच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत स्पष्टपणे दिसत असल्याचे मत व्यक्त होत आहे.


