महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप / पुणे ) – नगरसेवक हा जनतेचा थेट प्रतिनिधी असतो. कचरा व्यवस्थापन, गटारांची साफसफाई, प्राथमिक शिक्षण, दवाखाने, खेळाची मैदाने अशा मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवणे हीच त्याची खरी जबाबदारी असते. मात्र सध्याच्या महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी घेतलेले निर्णय पाहता, ही जबाबदारी विसरली गेली आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबातील, सध्या तुरुंगात असलेल्या दोन महिलांना उमेदवारी दिल्याने दमानिया यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. “तुरुंगातून नगरसेवक म्हणून त्या कचरा उचलणार आहेत का? गटारे साफ करणार आहेत का? नागरिकांच्या तक्रारी सोडवणार कशा?” असा थेट सवाल त्यांनी केला.
याच गटाने गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध व खुनाच्या आरोपांचा उल्लेख असलेल्या बापू नायर यांच्या पत्नीला आणि गजा मारणे यांच्या पत्नीला तिकीट दिल्याचेही दमानिया यांनी निदर्शनास आणले. दुसरीकडे भाजपनेही अपहरण, खंडणी आणि गोळीबाराच्या आरोपांशी संबंधित देविदास चोर्घे यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने त्यांनी सर्वच पक्षांवर निशाणा साधला.
“जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या अशा उमेदवारांकडून? शहर स्वच्छ होणार आहे की गुन्हेगारीला राजकीय संरक्षण मिळणार आहे?” असा जहरी प्रश्न उपस्थित करत दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राजकीय पक्षांनी जनतेचा अपमान करण्याचे काम थांबवावे.
ही निवडणूक विकासाची आहे की गुन्हेगारी वारशाची, असा सवाल विचारत “राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?” असा थेट हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या जहरी टीकेमुळे निवडणूक रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे.


