महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – शैक्षणिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ चा लौकिक देश आणि जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची मातृसंस्था असलेल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अजय जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या नूतन निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. अजय जाधव यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीनंतर, त्यांच्यासह संस्थेच्या शिष्टमंडळाने लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांची लातूर येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली. या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार अमित देशमुख यांनी नूतन अध्यक्ष डॉ. अजय जाधव आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लातूरच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भविष्यातील वाटचालीवर अध्यक्ष डॉ अजय जाधव आणि आमदार अमित देशमुख यांच्यात विस्तृत चर्चा केली , या भेटीत लातूरच्या गौरवशाली शैक्षणिक प्रगतीसंदर्भात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. लातूरने शिक्षणाच्या क्षेत्रात जे उच्च मापदंड प्रस्थापित केले आहेत, त्यांचे यश आणि सातत्य कायम राखण्यासाठी जे जे करणे शक्य आहे, त्या सर्व बाबींमध्ये पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी भक्कम ग्वाही यावेळी आमदार अमित देशमुख यांनी संस्थेच्या शिष्टमंडळाला दिली.
“लातूरच्या शैक्षणिक यशाचा आलेख असाच उंचावत ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले आहे,” डॉ. अजय जाधव यांच्या रूपाने संस्थेला मिळालेले नवे नेतृत्व आणि लोकप्रतिनिधींचे भक्कम पाठबळ यामुळे लातूरच्या शैक्षणिक विकासाला आणखी नवी आणि बळकट दिशा मिळेल, अशी भावना यानिमित्ताने आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली.




